GDP – विकासाचा हिशोब - भाग १ [१९ ऑगस्ट २०१९]
मंदीचे सावट तुम्ही आर्थिक वृत्तपत्रे वाचता का ? इकनॉमिक टाईम्स , बिझनेस स्टँडर्ड , द हिंदू बिझनेस लाईन , फायनान्शियल एक्सप्रेस , मिंट ही भारतातील काही अग्रगण्य आर्थिक वृत्तपत्रे . फायनान्शियल टाईम्स , द वॉल स्ट्रीट जर्नल ही या क्षेत्रातली काही आंतरराष्ट्रीय नावे. यांतील बरीच पत्रे काहीशा गुलबट रंगाच्या कागदावर छापण्यात येतात म्हणून त्यांना ‘ पिंक प्रेस ’ असे संबोधतात. तर सध्या सगळ्या पिंक प्रेसमध्ये जागतिक मंदीचे सावट हा चर्चेचा विषय आहे. भारतातसुद्धा चिंतेची चिह्ने आहेत. रडत खडत चाललेल्या देशी अर्थव्यवस्थेला कसा धक्का मारता येईल यावर पंतप्रधानांनी नुकतीच अर्थमंत्र्यांबरोबर चर्चा केली अशी बातमी होती. मंदी येते म्हणजे काय होते ? तर आर्थिक उलाढालीतील जोश कमी होतो. साधारणपणे उद्योग-व्यवसायांत भविष्याविषयी काहीसे निराशाजनक वातावरण निर्माण होते. येत्या काही महिन्यांत आपल्या धंद्याची वाढ खुंटणार की काय अशी भीती उद्योजकांना वाटू लागते. आयात निर्यात कमी होते. नवीन गुंतवणूक करायचे टाळले जाते. विक्री वाढत नसेल तरीपण नफ्याचे प्रमाण तेवढेच राखायचे असेल तर खर्च कमी कर...