GDP – विकासाचा हिशोब - भाग १ [१९ ऑगस्ट २०१९]

मंदीचे सावट



तुम्ही आर्थिक वृत्तपत्रे वाचता का? इकनॉमिक टाईम्स, बिझनेस स्टँडर्ड, द हिंदू बिझनेस लाईन, फायनान्शियल एक्सप्रेस, मिंट ही भारतातील काही अग्रगण्य आर्थिक वृत्तपत्रे. फायनान्शियल टाईम्स, द वॉल स्ट्रीट जर्नल ही या क्षेत्रातली काही आंतरराष्ट्रीय नावे. यांतील बरीच पत्रे काहीशा गुलबट रंगाच्या कागदावर छापण्यात येतात म्हणून त्यांना पिंक प्रेस असे संबोधतात. तर सध्या सगळ्या पिंक प्रेसमध्ये जागतिक मंदीचे सावट हा चर्चेचा विषय आहे. भारतातसुद्धा चिंतेची चिह्ने आहेत. रडत खडत चाललेल्या देशी अर्थव्यवस्थेला कसा धक्का मारता येईल यावर पंतप्रधानांनी नुकतीच अर्थमंत्र्यांबरोबर चर्चा केली अशी बातमी होती.



मंदी येते म्हणजे काय होते? तर आर्थिक उलाढालीतील जोश कमी होतो. साधारणपणे उद्योग-व्यवसायांत भविष्याविषयी काहीसे निराशाजनक वातावरण निर्माण होते. येत्या काही महिन्यांत आपल्या धंद्याची वाढ खुंटणार की काय अशी भीती उद्योजकांना वाटू लागते. आयात निर्यात कमी होते. नवीन गुंतवणूक करायचे टाळले जाते. विक्री वाढत नसेल तरीपण नफ्याचे प्रमाण तेवढेच राखायचे असेल तर खर्च कमी करण्यावर भर दिला जाऊ लागतो. कारखाने काही दिवस बंद ठेवावे लागतात कारण मालाला उठाव नसतो. लोकांच्या नोकर्‍या जातात. आर्थिक उत्पन्नातील वाढ कमी होते किंवा पूर्णपणे गायब होते. क्वचित उत्पन्नात घट दिसू लागते. एकूणच अवकळा पसरते. असे का होते याची कारणे खूप गुंतागुंतीची आहेत. आपल्याला कधी कधी बरे नाहीसे होते, अशक्तपणा येतो. ही लक्षणे जशी शारीरिक असू शकतात तशी कधी मानसिकसुद्धा असतात. उद्विग्नता, विषण्ण मनस्थिती, आत्मविश्वासाचा अभाव वगैरेमुळे आपल्या जीवनावर लघु किंवा दीर्घकालीन परिणाम सुद्धा होतात. माणसांना जे जे होते तेच विकार माणसांच्या समाजांना, देशांना, उद्योगांना आणि अर्थव्यवस्थांना होतात असे समजायला हरकत नाही.



कसं काय पाटील बरं हाय का?



तुमचे आयुष्य एकंदरीत कसे चालले आहे आणि गेल्या वर्षीपेक्षा ते सुधारले आहे की नाही असे तुम्हाला कोणी विचारले तर तुम्ही काय उत्तर देता? मस्त, मजेत, फारच छान, विशेष काही नवीन नाही, हाल होताहेत, वाट लागलीय, कंटाळा आलाय अशी उत्तरे पटकन देणे शक्य आहे. पण हे तुम्ही कशाच्या आधारावर सांगताय असे खोदून विचारले तर तुम्हाला जरा जास्त विचार करावा लागेल. आपली परिस्थिती सुधारते म्हणजे नक्की काय होते? गेल्या वर्षी मी तिसर्‍यांदा सीएच्या परीक्षेत नापास झालो होतो, पण यंदा पास झालो; किंवा या वर्षी मनाजोगते स्थळ मिळून लग्न झाले; किंवा अपत्यप्राप्ती झाली म्हणून तुम्ही खुश असाल. काहींना नवीन दुर्धर आजार झाल्यामुळे हे वर्ष वाईट ठरत असेल; किंवा नवीन आलेल्या बॉसशी जुळत नसल्याने ऑफिसात तुमची गाडी रुळावरुन घसरली असेल तर तुम्ही यंदा अस्वस्थ असाल. जे काही असेल ते असेल, पण तुमच्या आर्थिक उत्पन्नात यंदा झालेली वृद्धी किंवा घट ही तुमच्या लेखी किती महत्वाचा मुद्दा असेल? खूप वाईट साईट घटना तुमच्या आयुष्यात नुकत्याच घडून गेल्या असतील पण दिवाळीत मिळालेल्या १००% बोनसमुळे तुम्ही ह्या वर्षी जास्त सुखी झाला आहात असा निष्कर्ष तुम्ही काढाल का?



भय्या, आल इज वेल?



आता हाच प्रश्न एखाद्या देशाला विचारला तर? चित्तथरारक अन्तिम सामन्यात इंग्लंडने प्रथमच क्रिकेट विश्वचषक जिंकला ही त्या देशाची यंदाची जमेची बाजू. पण ब्रेक्झिटसारखी, देशाच्या मार्गक्रमणात विलक्षण कलाटणी देणारी आणि भविष्यासाठी अतिशय धोकादायक (किंवा सुमारे अर्ध्या-अधिक मतदारांच्या मते अतिशय योग्य आणि उपयुक्त) घटना आता होऊ घातली आहे त्यामुळे तिथले जनमानस प्रचंड अस्वस्थ आहे. राजकारण तसेच समाजकारण दुभंगले आहे. अनिश्चीततेमुळे उद्योग-व्यवसाय धास्तावले आहेत. मग ब्रिटिश लोक काही वर्षांपूर्वीपेक्षा आज जास्त सुखी आणि समृद्ध आणि आशावादी आहे असे मानायला काही जागा आहे का?



सुख किंवा समाधान किंवा निराशा किंवा दु:ख किंवा भीती आणि उमेद मोजता येत नाहीत. पण तुमचे उत्पन्न, स्थावर जंगम संपत्ती मोजता येते. मग एखादा देश / जनसमुदाय प्रगती करतो आहे की नाही, सुखी, समृद्ध होत आहे की नाही हे कसे ठरवायचे? विकासाची धोरणे आखताना कुठल्या आकड्यांचा आधार घ्यायचा? देश गरीब आहे की श्रीमंत हे कसे मानायचे?



क्या तुम्हारा बच्चा बढ रहा है?



मुलांनी दूध प्यावे म्हणून त्यात घालायच्या विविध भुकट्यांच्या जाहिराती आठवा. नुसते दूध म्हणजे पोषण शून्य म्हणे! आमची पूड घाला, तुमचा कार्टा दर वर्षी एक फुटाने वाढेल. त्याचा विकासहोईल. आता अशीच एखादी फूटपट्टी देशांच्या बाबतीत विकास मोजायला हवी होती. अर्थतज्ज्ञांनी शोधलेली ती फूटपट्टी म्हणजे जी डी पी – किंवा सकल/ढोबळ घरगुती उत्पादन.  



ही संकल्पना तशी अगदी अलीकडची...म्हणजे गेल्या शंभरेक वर्षातली. तसं म्हणायला सतराव्या शतकातील इंग्लंडात एका अर्थशास्त्रज्ञाने तत्कालीन सरकारी करधोरणाचे समर्थन करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नासंबंधी काही आकडेमोड करुन प्रसिद्ध केली होती. पण संकल्पनेचा जास्त विकास आणि वापर होऊ लागला तो विसाव्या शतकातील दोन महायुद्धांमुळे. देशाची लढाऊ क्षमता मोजण्यासाठी, युद्धकाळातली आर्थिक धोरणे ठरवण्यासाठी आणि युद्धोत्तर व्यवस्था लावताना साधन सामुग्रीच्या योग्य वाटपासाठी काही निकष ठरवणे गरजेचे होते. दोन महायुद्धांतील काळात सुद्धा जागतिक मंदीची मोठी लाट येऊन गेली होती. त्यामुळे एकंदरीतच अर्थतज्ज्ञांचे लक्ष राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक कल्याण या विषयाकडे वळले होते आणि नवनवीन अर्थशास्त्रीय संशोधन करणे, सिद्धान्त मांडणे सुरु झाले होते.



जीडीपी (Gross Domestic Product) म्हणजे काय?



Gross म्हणजे सकल किंवा ढोबळ. तुमच्या वार्षिक उत्पन्नाचा काही भाग हा तुमच्या मालमत्तेची डागडुजी करण्यात खर्च होतो. ह्या खर्चामुळे तुमच्या एकूण संपत्तीत किंवा चालू वर्षीच्या प्राप्तीत खरे तर काही नवीन भर पडत नाही. पण तुमची उत्पादन क्षमता आहे तेवढी तरी राखण्यासाठी हा खर्च आवश्यक असतो. एकूण उत्पन्नातून असा डागडुजीचा खर्च वजा केला तर मिळते ते नक्त (net) उत्पन्न, जे तुमची खरी वाढ दर्शवते. पण का कोण जाणे, Net Domestic Product किंवा एनडीपीच्या नशीबी जीडीपी सारखे मिरवण्याचे भाग्य नाही. सगळेजण जीडीपी ह्या मोठ्या आणि भारदस्त बहीणीकडेच जास्त डोळे लावून असतात.  



Domestic म्हणजे घरगुती. म्हणजे तुमच्या देशाच्या अंतर्गत तुमच्या उद्योगधंद्यांनी आणि रहिवाश्यांनी जे जे केले ते. तुमच्या कंपन्या किंवा देशवासी नागरिक भारताबाहेर सुद्धा काय काय करत असतात. उदा. एखाद्या भारतीय टेलीकॉम कंपनीने आफ्रिकेत पुरवलेल्या सेवा. किंवा तुमच्या तेल कंपनीने व्हेनेझुएलात काढलेले आणि युरोपात विकेलेले खनिज तेल. यांचा समावेश भारतीय घरगुती उत्पादनात करता येणार नाही. यांचा समावेश केला तर मिळते त्याला म्हणतात सकल राष्ट्रीय उत्पन्न (Gross National Product)



Product म्हणजे उत्पादन किंवा उत्पन्न. म्हणजे जे जे निर्माण केले / उत्पन्न केले ते ते. देशात बनलेला सगळा माल आणि पुरवलेल्या सेवा यांत अंतर्भूत होतात.



देशात आर्थिक उलाढाल जेवढी जास्त होईल तेवढे जीडीपी जास्त दिसेल. कारण जास्त आर्थिक उलाढाल म्हणजे जास्त मोठे उत्पादन / उत्पन्न. म्हणजे देशाची सांपत्तिक परिस्थिती अधिक चांगली. म्हणजे तो देश अधिक श्रीमंत. अधिक श्रीमंती म्हणजे प्रगती. म्हणून जीडीपीतली वाढ म्हणजे प्रगती आणि विकासाचे द्योतक असा समज दृढ झाला आहे. थोडक्यात सांगायचे तर देशाची किंवा एकूणच जगाची प्रगती मोजायची असेल, देशांची एकमेकांत तुलना करायची असेल, आर्थिक धोरणे आखायची / बदलाची असतील तर जीडीपीची फूटपट्टी अनिवार्य झाली आहे. पण ही फूटपट्टी कशी आणि कितपत चोख मोजणी करते, तिच्या मर्यादा आणि तिला असलेले इतर पर्याय याचा आढावा आपण या लेखाच्या पुढच्या भागात घेऊया.

Comments

Popular posts from this blog

दुष्कर प्राप्तिकर [२ जुलै २०१९]

सरकारचे (नसते) धंदे [२९ नोव्हेंबर २०१९]

गप्पुनॉमिक्स आणि पप्पुनॉमिक्स [२ मे २०१९]